शिसपेन्सिल........ ?
शिसपेन्सिल........ ?
शिसपेन्सिल हा शब्द आपल्या बोलीभाषेतील नेहमीचाच शब्द. खरं तर शिसपेन्सिलमधील शिसं हा शब्द शास्त्रीयदृष्टय़ा चुकीचा आहे. कारण या पेन्सिलीतील कागदावर काळ्या रंगाची रेष उमटवणारा पदार्थ शिसे नसून ग्रॅफाइट आहे. ग्रॅफाइट या ग्रीक शब्दाचा मूळ शब्द ग्राफलीन (लिहिणारा) असा आहे. १४व्या शतकाच्या आधी लिहिण्यासाठी 'शिसे' हा धातू वापरला जायचा. पुढे ग्रॅफाइटचा शोध लागल्यावर लिहिण्यासाठी ग्रॅफाइटचा वापर होऊ लागला पण शिसं हा शब्द तसाच राहिला. ग्रॅफाइट हे रूपांतरित खडकांमध्ये सापडणारं एक खनिज आहे. काही मूलद्रव्य वेगवेगळ्या स्वरूपांत निसर्गात पाहायला मिळतात. ग्रॅफाइट आणि हिरा ही कार्बन या मूलद्रव्याचीच रूपं आहेत. त्यांचे भौतिक गुणधर्म वेगवेगळे आहेत पण रासायनिक गुणधर्म सारखेच आहेत. ग्रॅफाइटचा रंग काळसर राखाडी असतो. ग्रॅफाइटच्या रेणूमध्ये सहा कार्बनचे अणू षटकोनी आकारात विशिष्ट पद्धतीनं जोडलेले असतात.
पेन्सिलींच शिसं तयार करताना विशिष्ट प्रकारची माती व ग्रॅफाइट एकत्र करून दळतात. त्यात थोडंसं पाणी घालून मिश्रण चांगलं मळून घट्ट गोळा करतात. नंतर दंडगोलाकार यंत्रात भरतात. यंत्र दाबल्यावर खालच्या भोकातून ग्रॅफाइटची अखंड कांडी मिळते. ही कांडी पेन्सिलीच्या लांबीएवढी तोडून तुकडे करतात व ते वाळवितात. नंतर ते ८०० ते १२००अंश सेल्सिअस असलेल्या भट्टीत भाजतात. ठिसूळ कांडय़ा नंतर स्निग्ध पदार्थ मेदाम्ले व मेण यांच्या मिश्रणात भिजवतात. जास्तीचं मेण काढण्यासाठी शिशावर रासायनिक क्रिया करतात. लाकडी पेन्सिलमध्ये घालावयाची कांडी साधारण १.८ ते ४.३ मि.मी. जाडीची असते. पेन्सिलवरील इ या अक्षरावरून ब्लॅक(काळ्या) रंगाचं प्रमाण समजतं तर ऌ या अक्षरावरून हार्डनेस (कठीणपणा) समजतं. 7ऌ असं लिहिलेली पेन्सिल 2ऌ असं लिहिलेल्या पेन्सिलीपेक्षा कठीण असते. या पेन्सिलची अक्षरं पुसट आणि बारीक असतात. या पेन्सिलीमध्ये मातीचं प्रमाण जास्त असतं आणि ग्रॅफाईटचं प्रमाण कमी असतं. पेन्सिलचा ठळकपणा 2इ पासून 7इ पर्यंत वाढत जातो.
No comments:
Post a Comment